Amazon

Wednesday, August 17, 2016

 

१३४) आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥

तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥

समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥

 

१३५) कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥

आनंदें तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥

ते माझें मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥

चोखा म्हणे ते माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

 

१३६) माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥

अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥

चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥

दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥

तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

 

१३७) माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥

पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥

तयाचिया सवें घडेल चिंतन । चंद्रभागे स्नान एकादशी ॥३॥

जागर क्षिरापती वैष्णव सांगाते । घडेल आपैतें लाभ मज ॥४॥

चोखा म्हणे घडेल संतांची संगती । सहज पंगती बैसेन मी ॥५॥

 

१३८) वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥

पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥

माझ्या विठोबाचें गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥

लोटांगणें सामोरा जाईन तयांसी । क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥

चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण । जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥

 

१३९) सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥

सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥

कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णव जन ॥३॥

चोखा तया पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥

 

१४०) अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥

विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥

चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥

चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥

 

१४१) असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥

स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥

सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें । मी आणि माझें परतें सारीं ॥३॥

चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥

 

१४२) असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥

संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥

काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥

चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥

 

१४३) आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥

पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥

परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥

चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥

 

१४५) आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥

करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥

न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥

करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥

मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥

 

१४६) उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥

ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥

इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥

प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥

वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥

चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥

 

१४७) ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥

कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥

चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥

 

१४८) कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें ॥१॥

मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥

एका आधी कैचे दोन । मज पासोन मी नेणें ॥३॥

चोखामेळा म्हणती संत । हे ही मात उपाधी ॥४॥

 

१४९) घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥

नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥

लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥

सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥

               

१५०) चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची ॥१॥

संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेची होती ॥२॥

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहवा खरा ऐसा ॥३॥

 

१५१) जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥

येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥

कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥

चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥

 

१५२) जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥

कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥

कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥

चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥

 

१५३) जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥

कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥

वैष्णवाचे घरीं लोळेन परवरी । करीं कधिकारी उच्छिष्टाचा ॥३॥

चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरी पशुयाती ॥४॥

 

१५४) जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥

कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥

ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखें ॥३॥

चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥

 

१५५) डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥

डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥

चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥

 

१५६) तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा ॥१॥

ताकोनी पळती रांडा पोरें । अंती होती पाठमोरे ॥२॥

अवघे सुखाचे सांगती । कोणी कामा नये अंती ॥३॥

चोखा म्हणे फजितखोर । माझें माझें म्हणे घर ॥४॥

 

१५७) तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥

आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥

झाला दिसे मज मोकळा  मारग । धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥

चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें । तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥

 

१५८) देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥

तीर्थ निर्मळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥२॥

नारदाची नारदी सरी । धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥

चोखा म्हणे हेंचि देई । स्नान घडो तये ठायीं ॥४॥

 

१५९) देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥

देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥

उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥

चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥

 १७९) काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥

विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥

सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥

विटाळाचे अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

 

१८०) कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥

कोणासी विटाळ कशाचा जाहला  । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥

पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥

चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥

 

१८१) उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥

रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥

कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥

चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंती यम फांसा गळां पडे ॥४॥

 

१८२) नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥

मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥

सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे । वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥

चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥

 

१८३) पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥

तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥

आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥

चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

 

१८४) वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥

जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥

ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥

जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥

 

No comments:

Post a Comment