Amazon

Tuesday, July 16, 2013

जिव्‍हे गोड तीन अक्षरांचा रस

ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥ अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णु । मकार महेश जाणियेला ॥२॥ ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्‍न । तो हा गजानन मायबाप ॥३॥ तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी । पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा, तुज नमो । तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥ नमो मायबापा, गुरुकृपाघना । तोडी या बंधना मायामोहा । मोहोजाळ माझे कोण नीरशील । तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥ सद्गुरुराया माझा आनंदसागर । त्रैलोक्या आधार गुरुराव । गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढे उदास चंद्र-रवी । रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा । स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥ एका जनार्दनी गुरू परब्रह्म । तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥ १ ॥ ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥ २ ॥ ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥ ३ ॥ सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥ ४ ॥

नाम तुझे बरवे गा शंकरा | नाम तुझे बरवे गा शंकरा । हर हर बरवे गा देवा शंकरा ।। गायिल्या ऐकिल्या होय वैष्णवा घरी । राम नामे तरले नेणो किती ।। ऐसा सदा आनन्द राउळी । विष्णुदास नामा पंढरपुरी ।।

पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळा बाइये वो ॥ वेधले वो मन तयाचिये गुणी । क्षणभरी न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ॥ पौर्णिमेचे चांदिणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणे एका विठ्ठलेविण ॥  बापरखुमादेवीवरु विठ्ठलुचि पुरे । चित्तचैतन्य मुरे बाइये वो ॥

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलीक राहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करितसे पाप भंगा ॥४॥ एका जनार्दनी शरण । करी माहेरची आठवण ॥५॥

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला । या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥ कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण । नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥ उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी । प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥ पंचतत्वांची गोफण, क्रोध पाखरें जाण । धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण । केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥ महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥ लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥ एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

वारियाने कुंडल हाले | डोळे मोडित राधा चाले || राधा पाहून भुलले हरी | बैल दुभवी नंदाघरी || फणस जंबिर कर्दळी दाटा | हाति घेऊन नारंगी फाटा | हरि पाहून भुलली चित्‍ता || राधा घुसळी डेरा रिता | ऐसी आवडी मिनली दोघा | एकरूप झाले अंगा || मन मिळालेसे मना | एका भुलला जनार्दना ||

वारी हो वारी | देई का गा मल्हारी | त्रिपुरारी हरी | तुझे वारीचा मी भिकारी ||१|| वाहन तुझे घोड्यावरी | वरी बैसली म्हाळसा सुंदरी | वाघ्या मुरुळी नाचती परोपरी | आवडी एसी पाहीन जेजुरी ||२|| ज्ञान कोटबां घेऊन आलो हरी | बोध भंडार लावीन परोपरी | एका जनार्दनी विनवी श्रीहरी | वारी देऊनी प्रसन्न मल्हारी |

विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥ १ ॥ चला जाऊं अळंकापुरा । संतजनाच्या माहेरा ॥ २ ॥ स्नान करितां इंद्रायणी । मुक्तां लागती चरणीं ॥ ३ ॥ ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥ ४ ॥

श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥ १ ॥ विटेवरी उभा वैकुंठनायक । आणि पुंडलिक चंद्रभागा ॥ २ ॥ अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें ॥ ३ ॥ सेना म्हणे चला जाऊं तया ठाया । पांडुरंग सखया भेटावया ॥ ४ ॥

सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्‍त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥ चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥कामक्रोधांचें न चलेचि कांही । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥ आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥ जिव्‍हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥२॥ श्रवणाची वाट चोखाळली शुध्‍द । गेले भेदाभेद निवारोनी ॥३॥ महामळे मन होतें जे गांदलें । शुध्‍द चोखाळलें स्‍फटिक जैसें ॥४॥ तुका म्‍हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सांपडले ॥५॥

No comments:

Post a Comment