Tuesday, June 25, 2013

हेरंब भजन मंडळ ( राग - शिवरंजनी)

हेरंब भजन मंडळातील शिवरंजनी रागात गाईले गेलेले अभंग...

सुंदरते ध्यान उभे विटोवरी | कर कटावरी ठेऊनीया ||  तुळशी हार गळा कासे पितांबर | आवडे नीरंतर हेचि ध्यान || मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणी विराजीत || तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहिन श्रीमुख आवडीने ||

देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥वदनीं तुझें मंगळनाम । अखंड सदोदित प्रेम ॥३॥जैसा तैसा असेल भाग । तैसा तैसा घडेल योग ॥४॥नामा म्हणे केशवराजा । केला पण चालवी माझा ॥५॥
 
  ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥ सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं भुक्तिमुक्ति दासी ॥३॥ एका जनार्दनीं पार नाहीं सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥

ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा । इतुक्या सहित तू बा यावे, माझे अंगणी नाचावे । माझे रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी । 


राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥ मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ॥३॥ कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ॥४॥ सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥

भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
 

No comments:

Post a Comment