Amazon

Tuesday, July 24, 2012

kahi nivadake abhang

 • ·         ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥ मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
 • ·         अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥ पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोवा ॥२॥ तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर ॥४॥
 • ·         अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥
 • ·         अबीर गुलाल उधळीत रंग | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥  आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
 • ·         अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥
 • ·         अर्थ इतकाचि साधिला । वेद अनंत बोलिला॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥२॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥३॥ अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४॥
 • ·         अलंकपुरासी पांडुरंग गेले | समाधिस्त केले ज्ञानदेवा ॥ उरकोनी सोहाळा सखे संत मेंळा | विठोबा राहिला आळंदीस   ॥ पाहे चक्रपाणी नामा डोळा पाणी | कंठ हा दाटोनी उभा राहे ॥ पुसे लक्ष्मीकान्त का रे तू निवांत | नामा शोकाक्रांत कोण दुखी .
 • ·         आजि संसार सुफ़ळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे ॥१॥ तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥ बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥
 • ·         आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला शीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥ तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
 • ·         आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करुं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥२॥ हित तें करावें देवाचे चिंत्तन । करुनियां मन शुद्ध भावें ॥३॥ तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फ़ार शिकवावें ॥४॥
 • ·         आम्हा घरीं धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दे वाटुं धन जनलोका ॥२॥ तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करुं ॥३॥
 • ·         आरंभी वंदीन अयोध्येचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ॥१॥ पावतसे महासंकटी निर्वाणी | रामनाम वाणी उच्चारीता ॥२॥ उच्चारिता नाम होय पापक्षय | पुण्याचा निश्चय, पुण्यभूमी ॥३॥ पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे| पापिया नाठवे काही केल्या ॥४॥ काही केल्या तुझे मन पालटेना| दास म्हणे जना,सावधान ॥५॥
 • ·         आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥ आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥ लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥ तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी ।पुरवावी आळी मायबापें ॥४॥
 • ·         इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची । ज्ञानियाचा राजा भोगतो जाणीव नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ॥१॥ मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे ॥२॥ विठ्ठलाऽऽऽ मायबापऽऽऽ उजेडी राहिले उजेड होऊनी निवृत्ति सोपान मुक्ताबाई ॥३॥
 • ·         उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥
 • ·         उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥ ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥२॥ ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे ॥३॥ तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे | पंढरी निर्माण केली देवे ॥४॥
 • ·         ऎसा ज्याचा अनुभव । विश्‍वदेव सत्यत्वें ॥१॥ देव तयाजवळी असे । पाप नासे दर्शनें ॥२॥ काम क्रोधा नाहीं चाली । भूतीं झाली समाता ॥३॥ तुका म्हणॆ भेदा-भेद । गेला वाद खंडोनी ॥४॥
 • ·         एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे । मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥ लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥ तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥
 • ·         ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥  घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥  तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका राखावा ॥३॥
 • ·         कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥ लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥ मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥ सांवतां म्हणे केला मळा । विठ्ठलपायीं गोविला गळा॥४॥
 • ·         कानडीनें केला मर्हांटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
 • ·         काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याति । वेद महिषामुखी बोलविले ॥धृ॥ कोठवरी वाणू त्याची स्वरुपकीर्ति । चालविली भींति मृतिकेचे ॥१॥ अविद्या मायाचा लावोनी निवारा । ऎसे जगजोद्धारे बोलाविले ॥२॥ नामा म्हणे नित्य तारिले पतित । भक्तीचे हे सारे ज्ञानदेव ॥३॥
 • ·         किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला l कंठ हा सोकला आळविता lमाझे हे निर्वाण किती बा पाहसी l पाव ह्रीशिकेशी मायबापा lगजेंद्राकारणे सत्वर धावसी l तैसा अनाथासि पावे मज lजीवना वेगळा तळमळी मासा l तैसे झाले देवा तुका म्हणे l
 • ·         किती वेळा जन्मा यावों । किती व्हावें फ़जीत ॥१॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥२॥ प्रारब्ध पाठी गाढें । न सरे पुढें चालतां ॥३॥ तुका म्हणे रोकडी हे । होती पाहें फ़जीती ॥४॥
 • ·         कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥ भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
 • ·         कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणीबंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारुं । उतरी पैल पारुं भवनदी ॥२॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
 • ·         खेळे खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥धृ॥ भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऎकता । रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥१॥ जात होती यमुनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी । माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥२॥ दास तुकड्या म्हणे ही लीला, देव गोकुळासी खेळला । उध्दरील्या सख्या गौळणी, राधिकेच्या मना मोहुनी ॥३॥
 • ·         गुणा आला ईटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥ निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥ तुका म्हणे समध्यान । हे चरण सकुमार ॥३॥
 • ·         गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥थोर पडतां सांकडें । गुरु रक्षी मागें पुढें ॥२॥काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥एका जनार्दनीं शरण । गुरु एक जनार्दनीं ॥४॥
 • ·         गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥  आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥ तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥
 • ·         घेईं घेईं माझें वाचे । गाडे नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥२॥ तुम्ही ऎका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥ मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥४॥ तुका म्हणॆ जीवा । नको सोडूं या केशवा ॥५॥
 • ·         चार युगा पावन | कली माजी सोपे भजन ||||मना दृढ धरी साचा | विठ्ठल विठ्ठल म्हणे वाचा ||||संकल्प नको भिन्न | तेणे पावशी हरी चरण ||||नामे जीवीचा जिव्हाळा | भानुदास जीवनकळा ||||
 • ·         चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥ देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥ मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥ वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥ तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥
 • ·         जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥  वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
 • ·         जन्मासी येवोनी पहा रे पंढरी नाचा महाद्वारी देवापुढे ॥धृ॥ चंद्रभागेतीरी करा तुम्ही स्नान घ्या रे दर्शन विठोबाचे ॥१॥ सेना म्हणे पुरलासे हेत डोळे भरूनी पहात विठ्ठलासी ॥२॥
 • ·         जयाचिये दारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥धृ॥ करील ते काय नोहे महाराज । परी पाये बीज शुद्ध अंगी ॥१॥ जयाने घातली मुक्तीची गवाळी । मिळवीली मादी वैष्णवाची ॥२॥ तुका म्हणे तेथे सुखा उणे काय सुखा काय उणे । राही समाधाने चीत्तीचीया ॥३॥
 • ·         जाऊं देवाचिया गांवां । देव देईंल विसांवा ॥१॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर ॥२॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥ तुका म्हणे आम्ही बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥४॥
 • ·         जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥ आणिक नये माझ्या मना । हो कां पंडित शहाणा ॥२॥ नाम रुपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४॥
 • ·         जे कां रंजले गांजलें । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥३॥ ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो ह्रुदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगु किती । तोचि भगविंताची मूर्ती ॥६॥
 • ·         ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली । जेणें निगमवल्ली प्रकट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥ अध्यात्मविद्येचे दाविलेसें रूप । चैंतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छप्पन भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ।।४॥ श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव । एकतरी ओवी अनुभवावी ॥६॥
 • ·         ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥ सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं भुक्तिमुक्ति दासी ॥३॥ एका जनार्दनीं पार नाहीं सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥
 • ·         टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची ॥धृ॥ पंढरीची हाट कौलाची पेठ | मिळाले चतुष्ठ वारकरी ॥१॥ पताकांचे भार मिळाले अपार | होतो जयजयकार भिमातीरी ॥२॥ हरीनाम गर्जता नाही भय चिंता | ऐसे बोले गिता भागवत |||| खट नट यावे शुद्ध होऊनी जावे | दवंडी पिटे भावे चोखामेळा ||||
 • ·         तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।। काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।। माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदरा ।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।
 • ·         तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम | ऐसा तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ | जळी दगडासहित वहया | जैश्या तरियेल्या लाहया | म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा |
 • ·         तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥
 • ·         तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥ कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥ हालकारे कृष्णा डोलकारे ॥ घडिये घडिये गुज बोलकारे ॥ध्रु०॥ उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥२॥
 • ·         तुझी आण वाहीन गा देवराया । बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥ कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु राया । बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥
 • ·         तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो ॥१॥ नवसिये नवसिये नवसिये वो । पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥ बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥
 • ·         तुमचिये दासीचा दास करुनि ठेवा । आशिर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलिली जे भक्ति । द्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणॆ तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरे भवनदी ॥३॥
 • ·         दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां मज ऎसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥ उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥३॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥
 • ·         देवा माझे मन लागो तुझे चरणी , संसार व्यसनी न पडो देही ॥धृ॥ नाम संकीर्तन संत समागम , चीऊगावा भ्रम नको देवा ॥१॥ पायी तिर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई ॥२॥ आणिक मागणे नाही नाही देवा , एका जनार्दनी सेवा नित्य घेई ॥३॥
 • ·         देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥वदनीं तुझें मंगळनाम । अखंड सदोदित प्रेम ॥३॥जैसा तैसा असेल भाग । तैसा तैसा घडेल योग ॥४॥नामा म्हणे केशवराजा । केला पण चालवी माझा ॥५॥
 • ·         धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया | धन्य ज्ञानदेव सोपान सकया ॥ शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही | सोपान तो ब्रह्मा मूळमाय मुक्ताई ॥ प्रय्तक्ष पैठणी भटा दाविली प्रचीती | रेडीयाच्या मुखी वदविली वेदश्रुती ॥ चौदाशे वर्षाचे तापितीरी रहिवाशी | गर्व हरविला चालविले जड भिंतीशी ॥ धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्यासी | भेटी झाली ज्ञानदेवाची ॥
 • ·         धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया l धन्य ज्ञानदेव सोपान सकया l शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही l सोपान तो ब्रह्मा मूळमाय मुक्ताई l प्रय्तक्ष पैठणी भटा दाविली प्रचीती l रेडीयाच्या मुखी वदविली वेदश्रुती l चौदाशे वर्षाचे तापितीरी रहिवाशी l गर्व हरविला चालविले जड भिंतीशी l धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्यासी l भेटी झाली ज्ञानदेवाची l
 • ·         धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥ ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥ शब्दें केली जुडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ॥३॥ सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ॥५॥
 • ·         धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ॥ ह्रुदय बंदी खाना केला | आत विठ्ठल कोंडीला ॥ शब्दे केली जडा जुडी | विठ्ठल पायी घातली बेडी ॥ सोहं शब्दे मारा केला | विठ्ठल काकुळ्ती आला ॥ जनी म्हणे बा विठ्ठला |जीव्हे न सोडी मी तुला ॥
 • ·         धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥ जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
 • ·         धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥१॥ ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन स्थिरावलें तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥३॥
 • ·         नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥ गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥३॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥४॥
 • ·         नाम गाऊं नाम ध्याऊं । नामें विठोबासी पाहूं ॥१॥ आम्ही दैवाचे दैवाचे । दास पंढरिरायाचे ॥२॥ टाळ दिंडी घेऊनि हातीं । केशवराज गाऊं गीतीं ॥३॥ नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥
 • ·         नेसले ग बाई मी साडी जरी बुट्याची तिरकी नजर माझ्या वरती सांवळ्या नेत्री घातले अंजन । भांगी भरला रे , माळली ग केसावरी फुलवेणी चमेलीची । पैंजण पायी माझ्या । चाल माझी ही तालात कुंडलेच कानी डुलती । चाल माझी हो ठेक्यांत । किती सांगू विठ्ठला रे । रीत माझी गरतीची । मुरलीच्या नादाने । बावरले मी ग भारी । यमुनेच्या पाण्या जाता । कडे घेतली घागरी । ओढ लागे अंतरीया हरीच्या ग संगतीची । तिरकी नजर माझ्या वरती सावळ्या हरीची ।
 • ·         पंढरीसी जारे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ॥२॥ मागील परिहार पुढें नाही सीण । जालिया दर्शन एकवेळा ॥३॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्ती निवडेना ॥४॥
 • ·         पतित तू पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥ तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥ याति शुद्ध नाही भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥ मुखी नाम नाही । कान्होपात्रा शरण पायी ॥४॥
 • ·         परिमळाची धांव भ्रमर ओढी । तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥ अविट गे माय विटेना। जवळींच आहे परि भेटेना ॥२॥ तृषा लागलिया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलीं आवडी । गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥
 • ·         पायो जी मैने राम रतन धन पायो ॥ वस्तु अमोलिक दी मेरे सत्गुरु | किरपा कर अपनायो ॥ जनम जनम की पुंजी पायी ॥ जग मे साखोवायो॥ खर्चे ने खूटे चोर न लूटे | दिन दिन बढत सवायो ॥ सत कि नाव केवाटिया सदगुरु |भवसागर तर्वायो ॥ मीरा के प्रभु गिरधर नागर | हर्ष हर्ष जस गायो॥
 • ·         पुढें ज्ञानेश्वर जोडोनियां कर । बोलतो उत्तर स्वामिसंगें ॥१॥ पाळिलें पोसिलें चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥ स्वामीचिया योगें जालों स्वरुपाकार । उतरलों पार मायानदी ॥३॥निवृत्तीचें हात उतरिला वदना । त्यागिलें निधाना आम्हालागीं ॥४॥ नामा म्हणे देवा देखवेवा मज । ब्रह्मीं ज्ञानराज मेळविला ॥५॥
 • ·         पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥ घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥ सांभाळिले सांभाळिले । सांभाळीले अनाथा ॥३॥ केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥
 • ·         फिरवीले देऊळ जगा मधी ख्याती | नामदेवा हाती दुध प्याला ॥ भरीयली हुंडी नरसीह मेहत्याची | धनाजी जाटाची शेते पेरी ॥ मीराबाईसाठी घेतो विष प्याला | दामाजीचा झाला पडेवार ॥ कबीराचे मागी विणुलागे शेले | ऊठविले मुल कुंभाराचे ॥ आता तुम्ही दया करा पंढरी राया | तुका विनवी पाया वेळोवेळा ॥
 • ·         भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥ भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
 • ·         भाव धरुनियां वाची ज्ञानेश्‍वरी । कृपा करी हरि तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्‍नु अर्जुनेसी ॥२॥ तेचि ज्ञानेश्‍वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्‍वरी ॥४॥
 • ·         भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
 • ·         भूमी भार वाया | का रे जन्म लिही काया ॥ना घडे वाचे नामस्मरण | जिव्हा नोहे चर्म जाण ॥ना घडे करे दान धर्म | कर नोहे ती सर्प जाण ॥पायी तीर्थयात्रा ना घडे | पाय नोहे ती लाकडे ॥ एका जनार्दनीचे वेडे | नरदेही प्रत्यक्ष रेडे ॥
 • ·         मथुरा मे प्रगट भयो भगवान | नंदाजी के घर नौबत बाजे | टाल मृदुंग और तान | सब हि राजे मिलन आये | छोड दिया अभिमान | मीरा के प्रभू गिरीधर नागर | निशिदिन धरीयो ध्यान |
 • ·         मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥ मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥ मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥
 • ·         मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥ विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥ भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥
 • ·         माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।। जैसे वत्सालागी गाय, जैसे अनाथांची माय, ॥हाकेसरशी घाई घाई, वेगे धांवतची पायी । आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात,॥ खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम । विष्णुदास आदराने, वाका घाली पदराने,
 • ·         माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥ नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥
 • ·         माझ्या बोवडिया बोला । चित्त द्यावें वा विठ्ठला ॥१॥ वारा जाय भलत्या ठायां । तैसी माझी रागछाया ॥२॥ गातां येईल तेणेंचि गावें । येरीं हरि हरि म्हणावें ॥३॥ तान मान नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥
 • ·         या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥ म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥ ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥ आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
 • ·         येई गा तु मायबापा पंढरीच्या राया । तुजविण क्षिण वाटे क्षिण झाली काया । यातीहीन मती हीन यातीहीन मतीहीन कर्महीन माझे । सर्व लज्जा सोडून बापा शरण आलो तुज । दिनानाथ दिन बंधू नाव तुम्हा साजे । पतीत पावन नाम ऐसी ब्रिदावली गाजे । विटेवरी नीट उभा कटेवरी कर । तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर ।
 • ·         येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे ॥१॥सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणें केशिराजे ॥२॥नामा म्हणे तूं विश्वाची जननी । क्षिराब्धिनिवासनी जगदंबे ॥३॥
 • ·         येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥ काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥ काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥ काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥ काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥ रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥
 • ·         राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥ मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ॥३॥ कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ॥४॥ सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥
 • ·         राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥३॥
 • ·         राम गावा राम घ्यावा राम जिवीचा बिसावा ॥धृ॥ कल्याणाचे कल्याण रघुपतीचे गूणगान ॥१॥ मंगलाचे मंगल, कौसल्येचा रामबाळ ॥२॥ राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी ॥३॥
 • ·         रुपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥ देह भाव हरपला । तुज पाहतां विठ्ठला ॥२॥ कळों नेदी सुखद:ख । तहान हरपली भूक ॥३॥ तुका म्हणॆ नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥४॥
 • ·         लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाभा ॥१॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥२॥ माझी अल्प ही वासना । तूं तो उदाराचा राणा ॥३॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥४॥
 • ·         लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऎरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥ ज्याचें अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥३॥ तुका म्हणॆ जाण । व्हावें लहानाहूनि लहान ॥४॥
 • ·         लागोनियां पाया विनवितो तुम्हांला । कर टाळीं बोला मुखें नाम ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा । हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥२॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥३॥ सकळांसी येथें आहे अधिकार । कलियुगीं उद्धार हरिनामें ॥४॥ तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति । ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥५॥
 • ·         विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो । तुटेल हा संदेहो । भवमूळव्याधीचा ॥१॥ म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरी श्रीधर । हें नाम आम्हां सारा । संसार तरावया ॥२॥ एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हां हरिपर्वणी । गाइली जे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ॥३॥ नेघों नामेंविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही । नामा म्हणे तरलों पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥
 • ·         विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ॥धृ॥ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥१॥ कोणाचा जिवाचा न घडे मत्सर वर्ग सर्वेश्‍वर पूजवावे ॥२॥ तुका म्हणॆ एक देहाचे अवयव । सुख दु:ख सर्व भोग पावे ॥३॥
 • ·         वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥ चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥ लुटालुटा पंढरपूर । धरा रखुमाईचा वर ॥२॥ तुका म्हणे चला । घाव निशानी घातला ॥३॥
 • ·         वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनष्टि नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ॥३॥
 • ·         शंख चक्र गदा रुळे वैजयंती ।कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ॥१॥ मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ॥२॥ रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥३॥ जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ॥४॥
 • ·         शरण शरण जी हनुमंता । तुम्हा आलो रामदूता ।। काय भक्तिच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ।। शुर आणिक धीर । स्वामी काजी तू सादर ।। तुका म्हणे रुद्रा । अंजनिचिया कुमरा ।।
 • ·         संत कृपा झाली इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया । नामा तयाच्या किंकर, त्याने केला हा विस्तार । जनार्दन, एकनाथ, खांब दिधला भागवत । तुका झालासे कळस, भजन करा सावकाश ॥
 • ·         संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥२॥ कंठी प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । ह्रुदयी प्रगटे नामरुप ॥३॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥४॥
 • ·         संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥ तेथें असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥ रंग भरें कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥३॥ सखा विरळा ज्ञानेश्र्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥ ऎशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥
 • ·         सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
 • ·         हनुमंत महाबळी। रावणाची दाढी जाळी॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर॥ध्रु॥ करोनि उड्डाण। केलें लंकेचे शोधन ॥२॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका॥३॥
 • ·         हरि बोलो भाई हरि बोलो भाई । हरि ना बोले वांकु राम दुर्‍हाई ॥१॥ काहेकु पढता खिन खिन गीता । हरिनाम लिया सो सब कुछ होता ॥२॥ मेरा मेरा कर कर क्या फ़ल पाया । हरिके भजन बिना झुठ गमाया ॥३॥ कहत कबीर हरिगुन गाना । गावत गाचत वैकुंठ जाना ॥४॥""
 • ·         हीन दीन जात मोरी पंढरी के राया । ऐसा तुमने नामा दरजी कायक बनाया ॥१॥ टाल बिना लेकर नामा राऊल में गाया । पूजा करते ब्रह्मन उनैन बाहेर ढकाया ॥२॥ देवल के पिछे नामा अल्लक पुकारे । जिदर जिदर नामा उदर देऊलहिं फिरे ॥३॥ नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध । तुम कहां के ब्रह्मन हम कहां के सूद ॥४॥ मन मेरी सुई तनो मेरा धागा । खेचरजी कें चरण पर नामा शिंपी लागा॥
 • ·         हेंचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसेचि राहावें । चित्तीं असा द्यावें समाधान ॥२॥ वाहिल्या उद्वेग दु :खचि केवळ । भोगणॆं तें फ़ळ संचिताचें ॥३॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥
 • ·         हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥ संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥ चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥

3 comments:

 1. संथ वाहे सरिता अवीट अभंगाची ॥
  वाटे किनारा होऊन जावे सवेची ॥
  *सुंदर* यादगार भाव'तो भक्तीने वंदनऽची॥

  ReplyDelete
 2. संथ वाहे सरिता अवीट अभंगाची ॥
  वाटे किनारा होऊन जावे सवेची ॥
  *सुंदर* यादगार भाव'तो भक्तीने वंदनऽची॥

  ReplyDelete