Amazon

Friday, July 24, 2009

अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ||
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ||
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ||
देव देहात देहात, का हो जाता देवळात ||
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ||

अरे अरे ज्ञाना झालासी पावन | तुझें तुज ध्यान कळों आले |
तुझा तूंचि देव तुझा तूंच भाव | फिटला संदेह अन्यतत्वी ||
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें | कोठें तुज रितें न दिसे रया ||
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती | घरभरी वाती शून्य झाल्या ||
वृत्तीची निवृत्ति अपणांसकट | अवघेंची वैकुंठ चतुर्भूज||
निवृत्ति परमानुभव नेमा | शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ||

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकूशाचा मार ||
ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण ||
तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहूनि लहान ||


इवलेंसे रोप लाविलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥१॥
मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां अतिभारू कळियांसी आला ॥२॥
मनाचिये गुंती गुंइफियेला शेला । बाप रखुमादेविवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥


नको देवराया अंत आता पाहू | प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले | मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी | धावे हे जननी विठाबाई
मोकलूनी आस, जाहले उदास | घेई कान्होपात्रेस हृदयात

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥
वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥
नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ॥४॥

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥


विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

जाणिव नेणीव भगवंती नाही । उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी काळचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥


अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

No comments:

Post a Comment