Amazon

Friday, July 24, 2009

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसें मन झालें हांवभरी परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासोनी उकलल्या गांठी देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले कामक्रोधे केले घर रीतें ॥४॥

संत कृपा झाली, | इमारते फ़ळा आली, ||
ज्ञानदेव रचीला पाया, | उभारले देवालया, ||
नामा त्याचा किंकर, | तेने केला हा विस्तार, ||
जनार्दन एकनाठ, | खांब दिला भागवत, ||
तुका झालेसे कळसा, भजन करा सावकाश ||

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा , ||
मृदु सबाह्य नवनीत, जैसे सज्जनाचे चित्त, |
ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी ||
दया करणे चे पुत्रासी, तोचि दासा आणी दासी, |
तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंताची मूर्ति ||

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसें मन झालें हांवभरी परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासोनी उकलल्या गांठी देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले कामक्रोधे केले घर रीतें ॥४॥

नामाचा गजर गर्जे भीमातीर महीमा साजे थोर तुज एका ॥१॥
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडीती उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनी गर्जती सनकादिक गाती कीर्ती तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणी लोळती चरणरज क्षिती शिव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करितो सांभाळु अनाथांचा ॥५॥

पंढरीसी जारे आलेनो संसारा दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तांतडी उतावीळ ॥२॥
मागील परिहार पुढें नाही सीण जालिया दर्शन एकवेळा ॥३॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं बैसला तो चित्ती निवडेना ॥४॥

पावलों पंढरी वैकुंठभुवन धन्य आजि दीन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥
पावलों पंढरी क्षेम आलिंगनीं संत या सज्जनीं निवविलों ॥३॥
पावलों पंढरी पार नाही सुखा भेटला हा सखा मायबाप ॥४॥
पावलों पंढरी येरझार खुंटली माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥
पावलों पंढरी आपुलें माहेर नाहीं संवसार तुका म्हणे ॥६॥

आधीं रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हां नव्हते चराचर तैं होतें पंढरपुर ॥२॥
जेव्हां नव्हती गोदा गंगा तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलिया भूमंडळ उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी म्हणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी ते म्यां देखिली पंढरी ॥७॥

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्ति भीमा उदक ते वाहे बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं एका जनार्दनी वारी करी ॥६॥

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ॥१॥
नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥२॥
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥
लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥४॥
वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥६॥


संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथ असे देव उभा जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जा जिव्हार ॥४॥
ऐशा संता शरण जावे जनी म्हणे त्याला ध्यावे ॥५॥


पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
हेची घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥

जातां पंढरीस सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संती या परती विश्रांती मिळे जीवा ॥६॥

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्ति भीमा उदक ते वाहे बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं एका जनार्दनी वारी करी ॥६॥

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी १॥
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई २॥
पुंडलिक बंधु आहे त्याची ख्याती सांगू काय ३॥
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा ४॥
एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण ५॥

सुख दुःख दोन्ही आम्हासी सारीखीं प्रतीती पारखी मना आली ॥१॥
अंतर्बाह्य एक बह्मचि कोंदलें दुजेपण गेलें निपटोनि ॥२॥
त्वचा टाकुनिया सर्प गेला बिळीं मग तो सांभाळी कोण सांगा ॥३॥
ओघ सांडूनिया गंगा सिंधुठाये विस्तराली धाये खळाळाची ॥४॥
नामा म्हणे रात्र जैसी कां पहाटे धरणी तें झाले तैसे आम्हां ॥५॥

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैषामुखीं बोलविले
कोठवरी वानूं याची स्वरुपस्थिती चालविली भिंती म्रुत्तिकेची
अविद्या मायेचा लागो नेदीं वारा ऐसें जगदोद्धारें बोलविले
नामा म्हणे यांनी तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवें

ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली जेणें निगमवल्ली प्रकट केली ।।१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचे दाविलेसें रूप चैंतन्याचा दीप उजळिला ।।३॥
छप्पन भाषेचा केलासे गौरव भवार्णवीं नाव उभारीली ।।४॥
श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव एकतरी ओवी अनुभवावी ॥६॥

तीर्थ विठठल क्षेत्र विठठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणोनि कळिकाळा पाड नाही

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दुख गेले जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

चक्रवाक पक्षी वियोगें बहाती झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥
चुकलीया माय बालकें रडती झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥
वत्स देखतां गाई हंबरती झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥
जीवनावेगळे मत्स्य तळमळती झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥
नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं करितसे खंती फार तूझी ॥५॥


काळ देहासी आला खाऊ | आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥
कोणे वेळे काय गाणे | हे तो भगवंता मी नेणे ॥२॥
टाळ मृदुंग दक्षिणेकडे | माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥
नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥

विठ्ठल आवडी प्रेमभावो विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो भवमूळ व्याधीचा ॥२॥
म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर
हेची नाम आम्हा सार संसार करावया प्रेमभावो ॥३॥
नेणो नामाविण काही विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥

माझा भाव तुझे चरणी | तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सापडलो एकामेका | जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
त्वा मोडिली माझी माया | मी तो जडलो तुझिया पाया ॥३॥
त्वा मज मोकलिले विदेही | मी तुज घातले हृदयी ॥४॥
नामा म्हणे गा सुजाणा | सांग कोणे ठकविले कोणा ? ॥५॥

नामाचा गजर गर्जे भीमातीर ।महीमा साजे थोर तुज एका ॥१॥
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडीती ।उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनी गर्जती ।सनकादिक गाती कीर्ती तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणी लोळती चरणरज क्षिती शिव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू करितो सांभाळु अनाथांचा ॥५॥

अमृताहूनि गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा कां बा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करू यांसी का रूप ध्यानासी येत तुझे ॥२॥
कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जति हरिनामाच्या कीर्ति नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

No comments:

Post a Comment